आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कावठे व प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, कासारे शाखेच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक दिंडी व वारीचे भक्तिमय आयोजन करण्यात आले. दोन्ही शाखांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत वारकरी परंपरेचा अनोखा अनुभव घेतला आणि संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला. वारीमध्ये चिमुकले विद्यार्थी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, विठ्ठल-रुक्मिणी, वारकरी तसेच विविध पारंपरिक वेशभूषेत सजून सहभागी झाले होते. हातात भगवे ध्वज, टाळ-मृदुंग, लाठी-काठी आणि लेझीमच्या तालावर “ज्ञानोबा-तुकाराम”, “विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल…” अशा अखंड नामघोषात विद्यार्थ्यांनी दिंडी काढली. चिमुकल्या वारकऱ्यांच्या निरागस भक्तीभावाने आणि उत्साहाने उपस्थित पालक व नागरिकांची मने जिंकली. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची संतपरंपरा, वारकरी संप्रदाय, भारतीय संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावून सांगणे हा होता. आधुनिक शिक्षणासोबत संस्कारमूल्ये आणि सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचा संदेश या वारीतून देण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील म्हणाले, “विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील ज्ञान न देता भारतीय संस्कृती, संतपरंपरा आणि संस्कारांची ओळख करून देणे हेही शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये भक्तीभाव, शिस्त, एकता आणि आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमान निर्माण होतो. या उपक्रमासाठी प्राचार्या वैशाली लाडे , समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रचितीच्या बाळगोपाळांनी साकारलेल्या या संयुक्त आषाढी वारीने उपस्थितांच्या मनावर अविस्मरणीय छाप पाडत आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.






















