राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांचा अनोखा आविष्कार; देशप्रेमाच्या घोषणांनी भारावला कावठे, साक्री व कासारेचा प्रचिती परिवार
तिरंग्याच्या रंगांनी सजला शाळा परिसर; विद्यार्थ्यांच्या नेते-स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषेने वाढवली कार्यक्रमाची रंगत कावठे, साक्री व कासारे : देशभक्तीचा उत्साह, तिरंग्याची शान आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा सुंदर मिलाफ साधत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या कावठे, साक्री आणि कासारे शाखांमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त तिन्ही शाखांमध्ये शाळा परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तिरंगी फुगे, पताका, फुलांची सजावट आणि देशभक्तीपर संदेशांनी संपूर्ण परिसर सजला होता. त्यामुळे शाळेच्या वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिकच खुलून दिसत होती. कावठे शाखेत रिटायर्ड सीआरपी ऑफिसर श्री. दीपक गुलाबराव सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. साक्री शाखेत डॉ. साहेबराव गोरख शिवदे यांच्या हस्ते, तर कासारे शाखेत गं. भा. सुरेखा सुधाकर देसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने वातावरण भारावून गेले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य, आकर्षक कवायत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध राष्ट्रीय नेते व स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषा. महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांसह विविध महान व्यक्तिमत्त्वांचे रूप विद्यार्थ्यांनी साकारले. त्यांच्या वेशभूषेतून देशाच्या इतिहासातील महान व्यक्तींच्या कार्याची आणि त्यागाची ओळख उपस्थितांना करून देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” अशा घोषणांनी शाळेचा परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, एकता आणि देशाप्रती असलेल्या कर्तव्याची भावना रुजविण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व सांगत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रामाणिकपणा, मेहनत, शिस्त आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे तसेच तिन्ही शाखांतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. तिरंग्याच्या रंगांनी सजलेला परिसर, देशभक्तीने भारलेले वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचा स्वातंत्र्य दिन सोहळा अविस्मरणीय ठरला.






















