साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कावठे तसेच साक्री शाखेत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महान नेते, समाजसुधारक आणि लोकजागृतीचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगते, भाषणे आणि देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी टिळक यांच्या विचारांचा आणि कार्याचा परिचय करून देत उपस्थितांना प्रेरित केले. यावेळी विद्यार्थ्यांना “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा लोकमान्य टिळकांचा प्रेरणादायी संदेश समजावून सांगण्यात आला. त्यांच्या राष्ट्रप्रेम, शिक्षणप्रेम, स्वाभिमान आणि समाजसेवेच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आदर्श नागरिक बनण्याचे आवाहन करण्यात आले. संस्थेचे चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील म्हणाले, “महापुरुषांचे विचार आणि आदर्श विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणे ही शिक्षणसंस्थेची महत्त्वाची जबाबदारी आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक जाणीव आणि संस्कार दृढ होतात. या कार्यक्रमासाठी प्राचार्या वैशाली लाडे, समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.





















