गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री व कावठे शाखेत गुरुतत्त्वाबद्दल आदर, कृतज्ञता आणि संस्कार यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरु वंदना, भक्तिगीते, मनोगते आणि सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांच्या पायांची छाप आणून त्यांची पूजनपूर्वक आरती केली, तसेच गुरु हेच जीवनातील पहिले मार्गदर्शक असल्याचा संदेश प्रभावीपणे दिला. या उपक्रमामुळे शाळेचे वातावरण भक्तिमय व भावनिक झाले. कार्यक्रमात शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना गुरुंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व, शिस्त, संस्कार आणि जीवनमूल्ये याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. संस्थेचे चेअरमन मा. श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देताना सांगितले की, “गुरु म्हणजे ज्ञान, संस्कार आणि यशाचा दीपस्तंभ. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या गुरुंचा आदर ठेवून ज्ञानाच्या मार्गावर प्रामाणिकपणे वाटचाल करावी.” या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे, तसेच सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. गुरुभक्ती, संस्कार आणि कृतज्ञतेचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवून गेला.





















