साक्री : रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ-बहीण यांच्या नात्यापुरता मर्यादित न ठेवता समाजातील विविध घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या कावठे साक्री व कासारे शाखांतील विद्यार्थ्यांनी राबविला. विद्यार्थिनींनी समाजसेवक, सफाई कामगार, पोलीस कर्मचारी तसेच दवाखान्यातील कर्मचारी यांना प्रेमाने राखी बांधून त्यांच्या सेवेला मनापासून सलाम केला. या उपक्रमास संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री. प्रशांत भीमराव पाटील, शाळेच्या प्राचार्या सौ. वैशाली लाडे तसेच समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रेरणेतून कावठे ,साक्री आणि कासारे शाखेतील विद्यार्थ्यांनीही समाजातील सेवाभावी व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा स्तुत्य उपक्रम उत्साहाने यशस्वी केला. समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणारे सफाई कामगार, रुग्णसेवेत योगदान देणारे दवाखान्यातील कर्मचारी आणि समाजहितासाठी कार्य करणारे समाजसेवक यांच्याप्रती विद्यार्थ्यांनी राखीच्या माध्यमातून प्रेम व आदर व्यक्त केला.
“रक्षण म्हणजे केवळ भाऊ-बहीण नव्हे, तर समाजातील प्रत्येक सेवाभावी व्यक्तीच्या योगदानाचा सन्मान!” हा सुंदर संदेश या उपक्रमातून देण्यात आला. राखीच्या छोट्याशा धाग्यातून विद्यार्थ्यांनी माणुसकी, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकीचा मोठा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.
विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी, कृतज्ञता, माणुसकी आणि सेवाभाव यांचे संस्कार मिळावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. साक्री, कावठे-साक्री आणि कासारे या तिन्ही शाखांमध्ये रक्षाबंधनाला लाभलेली ही सामाजिक जिव्हाळ्याची किनार उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरली. तसेच देशाच्या सीमेवर अहोरात्र तैनात राहून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांसाठी विद्यार्थ्यांनी प्रेम, आदर आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून राख्या पाठविल्या.





















