साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या साक्री, कावठे आणि कासारे या तिन्ही शाखांमध्ये शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी ‘ग्रीन डे’ अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना हिरव्या रंगाची ओळख करून देतानाच निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. शाळेचे चेअरमन आदरणीय श्री. प्रशांत भीमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याध्यापिका सौ. वैशाली लाडे, तसेच समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही शाखांमध्ये या उपक्रमाचे सुंदर नियोजन करण्यात आले. तिन्ही शाखांचा परिसर हिरव्या रंगाच्या आकर्षक सजावटीने नटला होता. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाचे विविध सुंदर पोशाख परिधान करून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाशी संबंधित विविध कल्पक व आकर्षक मॉडेल्स तयार करून आणली होती. त्यांच्या सर्जनशीलतेने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी हिरवा रंग ओळखा, रंगसंगती, विविध खेळ, कविता, गाणी आणि मनोरंजक कृती घेण्यात आल्या. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी आनंद घेतानाच कृतीतून शिकण्याचा अनुभव घेतला. “झाडे लावा, झाडे जगवा, पाणी वाचवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असून त्याचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी साक्री, कावठे आणि कासारे शाखांतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियोजनपूर्वक मेहनत घेतली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, आकर्षक सजावट, विविध शैक्षणिक व मनोरंजक उपक्रमांमुळे तिन्ही शाखांमध्ये ‘ग्रीन डे’ला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. हिरवाईचा उत्सव, निसर्ग संवर्धनाचा संदेश आणि चिमुकल्यांच्या सर्जनशीलतेची सुंदर सांगड घालत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या साक्री, कावठे व कासारे शाखांचा ‘ग्रीन डे’ अविस्मरणीय ठरला.
























