आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या कावठे व साक्री शाखांमध्ये आषाढी वारी व दिंडीचा उत्साहपूर्ण सोहळा संपन्न झाला. कावठे शाखेतील इयत्ता दुसरी ते दहावीचे विद्यार्थी तसेच साक्री शाखेतील प्री-प्रायमरी विभागातील चिमुकल्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत वारकरी परंपरेचे आकर्षक दर्शन घडविले. दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी लाठी-काठी, लेझीम, टाळ, मृदुंग, भगवे ध्वज आणि तुळशी वृंदावन यांसह पारंपरिक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. “ज्ञानोबा-तुकाराम”, “जय जय राम कृष्ण हरी” आणि “विठ्ठल विठ्ठल” या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची संतपरंपरा, वारकरी संप्रदाय, भारतीय संस्कृती तसेच शिस्त, एकात्मता, सेवाभाव आणि भक्ती यांचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावून देण्यात आले. शाळेचे चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत, भारतीय संस्कृतीची जपणूक करणारे असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या सौ वैशाली लाडे,समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. उत्साह, भक्ती आणि संस्कारांचा संगम घडविणारा हा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.


















