उन्हाळी सुट्टीनंतर प्रचिती इंटरनॅशनल स्कूल बुधवार, दिनांक ३ जून २०२६ पासून पुन्हा नियमितपणे सुरू झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिसरात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने आणि आनंदी वातावरणाने चैतन्य निर्माण झाले.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना नव्या शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरित केले.
याप्रसंगी शाळेचे चेअरमन प्रशांत भीमराव पाटील यांनी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व कर्मचाऱ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच उत्तम संस्कार, शिस्त आणि नैतिक मूल्ये आत्मसात करून यशस्वी नागरिक बनावे, असे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले.
शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत नव्या वर्षात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळा कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच समन्वयक श्री तुषार देवरे व श्री वैभव सोनवणे सोनवणे यांनीही विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत नियमित उपस्थिती व अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले.
नवीन उमेद, नवीन संकल्प आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने घेऊन प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात झाली आहे. सदर कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मावशी व ड्रायव्हर बंधू या सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.





















