साक्री, दि. ५ जून २०२६: प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती, स्वच्छता अभियान तसेच विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री. प्रशांत भीमराव पाटील हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज असून भावी पिढीसाठी स्वच्छ व हरित वातावरण निर्माण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचे मार्गदर्शन केले. तसेच समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री वैभव सोनवणे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात कोणते बदल करावेत याविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
“एक विद्यार्थी – एक वृक्ष” हा संदेश देत प्रचिती परिवाराने पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले.























