प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कावठे तसेच साक्री व कासारे शाखांमध्ये पूर्वप्राथमिक विभागात ‘रेड डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना लाल रंगाची ओळख करून देणे, रंगांविषयी आवड निर्माण करणे आणि प्रत्यक्ष कृतीतून आनंददायी शिक्षण देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. या प्रसंगी नर्सरी, एलकेजी व यूकेजीच्या विद्यार्थ्यांनी लाल रंगाचे आकर्षक पोशाख परिधान करून विविध लाल रंगाच्या वस्तू, फळे, फुले तसेच शैक्षणिक साहित्याचे आकर्षक प्रदर्शन सादर केले. विद्यार्थ्यांनी लाल रंगाशी संबंधित कविता, गीते, नृत्य, विविध कृती व शैक्षणिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उपस्थितांची मने जिंकली. याचबरोबर रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि कल्पकतेला उत्तम वाव मिळाला. या उपक्रमाबद्दल शाळेचे आदरणीय चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे कौतुक केले. प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सर्जनशील व सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन केले. समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पूर्वप्राथमिक विभागातील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. पालकांनीही विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य व आकर्षक पोशाख उपलब्ध करून देत उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य केले. संपूर्ण परिसर लाल रंगाच्या उत्साहाने आणि चिमुकल्यांच्या निरागस आनंदाने बहरून गेला.






















