साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वामी विवेकानंद यांची जयंती युवा दिन म्हणून साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे प्राचार्य अतुल देव व शाळेचे व्यवस्थापक तुषार देवरे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी विवेकानंदांना अभिवादन करण्यात आले.
शामल अनिल पाटील या सहावीच्या विद्यार्थीनीने आपले मनोगत व्यक्त केले. भारतीय संस्कृती व हिंदू धर्माचे महत्व शिकागो येथे पार पाडलेल्या धर्मपरिषदेत विवेकंदांनी जगाला समजावून संगितले. वेद, उपनिषदे, पुराण यांचा सखोल अभ्यास व धर्म विषयी नितांत आदराची भावना, प्रत्येक गोष्ट मनापासून करण्याची जिद्द, एकाग्रता व चिकटी या जोरावर स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगाला मोहिनी घातली होती असे विचार शाळेचे प्राचार्य अतुल देव यांनी या प्रसंगी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात व्यक्त केले. या प्रसंगी शाळेचे कला शिक्षक भूपेंद्र साळुंखे व राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ग्रीटिंग कार्ड बनविणे’ स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘ग्रीटिंग कार्ड’वरून असे जाणवते की, स्वामीजींच्या विचाराचा पगडा विद्यार्थ्यांवर पडला आहे असे गौरवोद्गार संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी काढले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माळीचकर यांनी केले.