प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये रंगला दोन दिवसीय वार्षिक क्रिडा महोत्सव
पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल येथे वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, बेडूक उडी, लंगडी या खेळांनी महोत्सवात रंगत आणली. शालेय क्रीडा महोत्सवाला बुधवार, १ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. ४ जानेवारी रोजी विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देवून स्पर्धेचा समारोप करण्यात आला. विद्यार्थ्यांनी २ दिवस या क्रीडा महोत्सवाचा मनमुराद आनंद घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे अंकुश राजेंद्र पाठक (हॉलीबॉल चॅम्पियन) यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी परेड सादर करत त्यांचे स्वागत केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील, समन्वयक राहुल अहिरे तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते. प्रमुख पाहुण्याच्या सत्कार शाळेचे समन्वयक राहुल अहिरे यांनी केला. पाहुण्यांच्या हस्ते मशाल प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रतिज्ञा सादर केली. त्यांना अर्चना देसले यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यार्थ्यांनी डंबेल डान्स व चियर अप डान्स सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. इयत्ता ६, ७, ८ वी च्या विद्यार्थ्यांनी मनोरे तयार करून कार्यक्रमात स्फूर्ती आणली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अंकुश पाठक यांनी त्यांच्या भाषणातून खेळाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देत खेळण्यास प्रोत्साहित केले. तसेच, भारतीय संघात हॉलीबॉल चॅम्पियन पर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांसोबत मांडला. Practise makes man Perfect असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. महोत्सवास इयत्ता ४ थीच्या विद्यार्थ्यांच्या धावणे शर्यतीपासून सुरुवात करण्यात आली. नर्सरी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्ग शिक्षकांनी आयोजित केलेल्या खेळामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संयोजन कल्याणी काकुस्ते व सरिता अहिरे यांनी केले.
वार्षिक क्रीडा स्पर्धेसाठी रांगोळी अश्विनी पगार, किरण देवरे आणि रिनल भामरे यांनी रेखाटली. तसेच सुबक असे फलकलेखन काजल राजपूत, मयूरी सोनार यांनी केले. कार्यक्रमासाठी सेल्फी पॉइंट अर्चन देसले, सुनिता जाधव, वैशाली वाघ, जागृती बिरारीस, योजना व अनिता पवार यांनी तयार केले. संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रीकरण अश्विनी पगार, काजल राजपूत यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रूपेश कुवर यांनी केले. आभार अश्विनी पगार यांनी मानले.