प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारताच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
साक्री: प्रचिती इंटरनॅशनल स्कूल साक्री येथे भारताच्या प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्या हस्ते स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत सत्कारानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. शिक्षक कुणाल पानपाटील, शिक्षिका हेमांगी बोरसे यांनी सावित्रीबाई फुले जयंत्ती निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्हयात झाला. त्या एक भारतीय थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ञ व कवियित्री होत्या. पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री- शिक्षणाचे प्रणेते आहेत. या दोघांनीही १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे- वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती. त्यांनी “विद्या हेच धन आहे.” हा संदेश स्त्रीयांना देऊन स्त्री-ज्ञानाची ज्योत पेटवली. सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या स्त्री शिक्षणामुळे भारताच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर-आनंदीबाई जोशी, थोर सामाजिक कार्यकर्त्या-सिंधूताई सपकाळ, पहिल्या अवकाशवीर- कल्पना चावला,भारतीय महिला संघाची माजी कर्णधार-मिताली राज,बॅडमिंटनपटू-पी.व्ही.सिंधू,सायना नेहवाल, भारतीय गान साम्राज्ञी-लता मंगेशकर, गायिका-अनुराधा पौडवाल, अशा अनेक क्षेत्रात अनेक कर्तबगार स्त्रीया उदयास आल्या. तसेच महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपण थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. आणि त्या एक लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले. इसवी सन १८९७ मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले. या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली. त्यातच १० मार्च १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. १० मार्च १९९८ रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले. ३ जानेवारी २०१७ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिनानिमित्त “गुगल डूडल” प्रसिद्ध करून गुगलने अभिवादन केले, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन हेमांगी गवांदे यांनी केले. तसेच कार्यक्रमाची सजावट व फलक लेखन किरण गवळी, दीपमाला अहिरराव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पाटील यांनी केले. शेवटी सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यातून क्रांतीज्योती-सावित्रीबाई फुले यांच्या जयंत्तीनिमित्तचा कार्यक्रम आनंदात व उत्साहात पार पडला.