अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
राज्यभरातून ७.७४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी भरले अर्ज
राज्यातील इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत तब्बल ७ लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा पहिला भाग पूर्ण केला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे यंदाही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून राबविण्यात येत आहे.
राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता वेळेत अर्ज भरावेत, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
८ मेपासून शून्य फेरीला सुरुवात
अकरावी प्रवेश प्रक्रियेची शून्य फेरी ८ मेपासून सुरू झाली असून या टप्प्यात विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग भरता येत आहे. तर ११ मे ते १३ मे या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला व दुसरा भाग भरता येणार आहे. यामध्ये व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्यांक कोटा तसेच इन-हाऊस प्रवेशासंदर्भातील माहिती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
१० कनिष्ठ महाविद्यालयांना प्राधान्यक्रम देता येणार
विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेदरम्यान किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांची प्राधान्यक्रमानुसार निवड करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गुणांनुसार आणि पसंतीनुसार महाविद्यालयांची निवड काळजीपूर्वक करावी, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
१४ मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी
प्रवेश प्रक्रियेअंतर्गत १४ ते १५ मे दरम्यान तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये काही त्रुटी आढळल्यास विद्यार्थ्यांना १६ मे रोजी हरकती नोंदवण्याची संधी दिली जाणार आहे.
२० मेपासून नियमित प्रवेश फेरी
२० मे रोजी रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येणार असून त्याच दिवसापासून नियमित पहिल्या प्रवेश फेरीला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांनी वेळापत्रक आणि आवश्यक सूचना नियमितपणे तपासाव्यात, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबतचे सविस्तर वेळापत्रक व मार्गदर्शक सूचना शिक्षण संचालक कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहे.




















