प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेरमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; पहिला दिवस ठरला अविस्मरणीय!
पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये आज, सोमवार, ९ जून २०२५ रोजी शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचा किलबिलाट, त्यांची उत्सुकता आणि जुन्या मित्रांना भेटण्याची ओढ यामुळे संपूर्ण शाळा गजबजून गेली होती.
पुन्हा ते मित्र, पुन्हा ती मजा, पुन्हा तो शाळेत मिळणारा आनंद – अशा उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांनी आपला पहिला दिवस हाऊसफुल्ल ठरवला. काही नवीन विद्यार्थ्यांच्या मनात थोडी धाकधूक असली तरी, शाळेकडून झालेल्या प्रेमळ स्वागताने चिमुकल्यांचा आनंद द्विगुणीत झाला. शिक्षकांना भेटण्याची घाई आणि पालकांची गर्दी यामुळे शाळेत चैतन्याचे वातावरण होते.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष, प्रशांत भीमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. शाळेचे समन्वयक राहुल अहिरे आणि मुख्याध्यापिका अनिता पाटील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांचे औक्षण करून आणि फुलांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू आणि मित्रांना भेटून व्यक्त केलेला आनंद पाहण्यासारखा होता. शिक्षिकांनीही विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आणि ऍक्टिव्हिटीज आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यामुळे शाळेचा पहिला दिवस त्यांच्यासाठी अधिक मनोरंजक ठरला. जुने मित्र भेटल्यावर अनेक मुले आनंदात होती, तर स्कूल बसमध्येही मुलांनी धमाल मस्ती केली.
आजच्या कार्यक्रमाचे नियोजन सुनीता जाधव यांनी केले होते. सेल्फी बॅनरची सजावट अर्चना देसले, अश्विनी, किरण, प्रेरणा, शितल आणि योजना जाधव यांनी केली. सुंदर फलक लेखन सरिता अहिरे आणि वैशाली जगताप यांनी केले. तसेच, सुंदर रांगोळीचे रेखाटन वैशाली वाघ, दिव्या जाधव आणि सायली पवार यांनी केले होते. जागृती बिरारीस यांनी सुंदर चित्रफित तयार केली, तर विद्यार्थ्यांची सुंदर छायाचित्रे मयुरी यांनी काढली.
अशाप्रकारे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शाळेचा पहिला दिवस यशस्वीपणे पार पडला, जो विद्यार्थ्यांच्या स्मरणात कायम राहील.