प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेरचा धुळे जिल्ह्यात डंका! उत्कृष्ट शाळेसह शिक्षिकेचा आदर्शवत सन्मान
साक्री: महाराष्ट्र इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनच्या राज्यस्तरीय अधिवेशनात पिंपळनेर येथील प्रचिती इंटरनॅशनल पब्लिक स्कूलने धुळे जिल्ह्यातील उत्कृष्ट पब्लिक स्कूलचा पुरस्कार पटकावला. याच शाळेतील शिक्षिका सौ. अश्विनी पगार यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श शिक्षिका पुरस्काराने मुंबईत गौरविण्यात आले. मेस्टाचे अध्यक्ष मा. संजय तायडे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण अत्यंत सन्मानपूर्वक वातावरणात झाले.
प्रचिती पब्लिक स्कूल विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासावर लक्ष केंद्रित करून त्यांच्यावर उत्तम संस्कार रुजवते. या शाळेतील विद्यार्थी दरवर्षी उत्कृष्ट शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहेत.
सौ. अश्विनी पगार या केवळ शाळेतील शिक्षिका नाहीत, तर त्या ज्ञानदानासोबतच समाजसेवेतही सक्रिय आहेत. आपल्या अध्यापनातून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवतानाच, त्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवतात. विशेष म्हणजे, शाळेतील विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर गरजू मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी त्या सुट्ट्यांमध्ये विविध खेड्यापाड्यांमध्ये जातात. तेथे मुलांना एकत्र करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्या करतात. या विद्यार्थ्यांसाठी त्या कृतीवर आधारित शिक्षण पद्धतीचा वापर करतात आणि गणित विषयाला दैनंदिन जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विषय अधिक सोपा वाटतो. ‘देशाचे भविष्य मुलांच्या हातात आहे’ या विचारांवर त्यांचा दृढ विश्वास आहे आणि एका शिक्षकामध्ये भावी पिढी घडवण्याची क्षमता असते, असे त्या नेहमी सांगतात.
मुंबई येथे आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरव झाल्यानंतर, प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे अश्विनी पगार यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्या अनिता पाटील, शाळा समन्वयक राहुल अहिरे (पाटील) आणि सर्व शिक्षक-शिक्षिकांनी त्यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले.
सौ. अश्विनी पगार यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल संपूर्ण पिंपळनेर शहर आणि परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. प्रचिती पब्लिक स्कूलला उत्कृष्ट शाळेचा आणि सौ. पगार यांना आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार मिळणे ही संपूर्ण परिसरासाठी गौरवाची बाब मानली जात आहे.
शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आदर्श शिक्षक सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला.