प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेरमध्ये समाजसेवेच्या अनोख्या वाढदिवसाची परंपरा कायम; संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गोरगरिबांना मदतीचा हात…
पिंपळनेर: प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे आज शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील, आणि त्यांची लाडकी कन्या स्वरा पाटील यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि एका अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. नेहमीच्या पार्ट्या आणि सेलिब्रेशनला फाटा देत, संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी समाजसेवेची परंपरा कायम ठेवली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांचा वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे नव्हे, तर समाजाला काहीतरी परत देण्याचा एक प्रयत्न असतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, शाळेच्या समन्वयक राहुल पाटील, मुख्याध्यापिका अनिता पाटील, आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज गरीब व गरजू लोकांमध्ये, तसेच ग्रामीण रुग्णालयांमधील रुग्णांना कपडे, फराळ आणि फळे वाटप केले. हा उपक्रम केवळ वाढदिवसाचा सोहळा नसून, सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण आहे, जो विद्यार्थ्यांनाही प्रेरणा देतो.
या प्रसंगी, शाळेच्या प्रांगणात अध्यक्ष प्रशांत पाटील आणि स्वरा पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी एक छोटाखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. समन्वयक राहुल पाटील आणि मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी आपल्या मनोगतातून अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या दूरदृष्टीचे आणि समाजाप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाचे कौतुक केले. त्यांनी “शिखरे उत्कर्षाची तुम्ही करीत राहावी, कधी वळून पाहत आमची शुभेच्छा स्मरावी! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे! तुमच्या जीवनात सर्व काही मनासारखे घडू दे! तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे,” अशा हृदयस्पर्शी शब्दांत शुभेच्छा दिल्या. शाळेतील इतर शिक्षकांनी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आणि चालक बंधूंनीही संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील आणि स्वरा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या अनोख्या वाढदिवस सोहळ्याला शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि चालक बंधू उपस्थित होते. या कार्यक्रमातून केवळ वाढदिवस साजरा झाला नाही, तर सामाजिक जबाबदारी आणि माणुसकीचे महत्त्व अधोरेखित झाले. प्रशांत पाटील यांनी घालून दिलेली ही परंपरा प्रचिती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी एक अमूल्य धडा आहे, जो त्यांना भविष्यात एक संवेदनशील नागरिक बनण्यास मदत करेल.