प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये शैक्षणिक वर्षाचा शानदार प्रारंभ; चिमुकल्यांचे उत्साहात स्वागत
साक्री: प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्रथम सत्राचा मोठ्या उत्साहात आणि आनंदात प्रारंभ झाला. एक महिन्याच्या सुट्ट्यांनंतर शाळेची घंटा वाजताच, विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळेचा परिसर पुन्हा गजबजून गेला.
शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य वैशाली लाडे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे आणि तुषार देवरे यांच्या हस्ते प्रथम दिनाचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले.
या खास प्रसंगी, शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना गंध लावून, पुष्पगुच्छ देऊन, गोड वस्तू वाटप करून तसेच नवीन वही-पेन देऊन त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवसाचा उत्साह विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. शाळेचे अध्यक्ष, प्राचार्य, शाळा समन्वयक आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना शाळेतील जीवनाविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
या प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या खेळविषयक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेतला आणि शाळेतील पहिल्या दिवसाचा मनसोक्त आनंद लुटला.
आजच्या दिवशी काही पालक आपल्या मुलांना शाळेत सोडायला आले होते, तर काही विद्यार्थी स्वतः दुचाकी किंवा चारचाकी वाहनांनी शाळेत पोहोचले. नव्या गणवेशात, नव्या पुस्तकांसह आणि नव्या शूज परिधान करून आलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर नवीन वर्ग, नवीन माहिती, नवीन मित्र-मैत्रिणींची ओळख आणि वर्गशिक्षक कोण असणार याबद्दलची उत्सुकता स्पष्ट दिसत होती. शांत पडलेला शाळेचा परिसर पुन्हा विद्यार्थ्यांच्या चैतन्याने आणि उत्साहाने भरून गेला होता. रस्त्यावर विद्यार्थी-पालकांची गर्दी दिसू लागली आणि सक्तीच्या रजेवर गेलेल्या स्कूल बसेस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या.
हा प्रवेशोत्सव कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेविषयीची भीती घालवणारा आणि त्यांच्या मनात शाळेविषयी आपुलकी, अभ्यासाविषयी आवड आणि मित्र-मैत्रिणींमध्ये आपुलकीचे नाते निर्माण करणारा ठरला.
या कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सर्व शिक्षकांनी छोटेसे नृत्याचे सादरीकरणही केले. फलक लेखन, सुंदर सजावट आणि रांगोळी काढण्याचे कार्य जितेंद्र कासार, दीपमाला अहिरराव, वैष्णवी देवरे आणि सविता लाडे यांनी केले. सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शाळेचा हा प्रवेशोत्सव दिन मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या साजरा करण्यात आला.