प्रचिती इंटरनॅशनल स्कूलतर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त अभिवादन
साक्री:- प्रचिती इंटरनॅशनल स्कूलतर्फे शनिवार, दि. 11 रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य-वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे आदी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले.
प्रसंगी, शिक्षिका तेजस्विनी घरटे यांनी राजमाता जिजाऊ यांच्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावी झाला. त्यांचे वडील लखुजी जाधव हे शिंदखेड नावाच्या गावाचे राजे होते. मालोजी राजे भोसले यांचे सुपुत्र शहाजी राजे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. जिजाबाईंना ६ मुली २ मुले त्यापैकी एक शिवाजी राजे. जिजाबाई यांनी मराठा साम्राज्यासाठी अनेक निर्णय घेतले. जिजाबाईंनी मराठा साम्राज्यासाठी शिवाजी महाराजांना रामायण- महाभारत यातील भगवान श्रीराम, श्रीकृष्ण, अर्जुन या शूर- वीरांच्या कथा सांगून त्यांच्यात धर्म रक्षणाची भावना जागवली, असे त्यांनी सांगितले. कांचन अहिरराव यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथे झाला. स्वामी विवेकानंद हे एक भारतीय संन्याशी आणि तत्वज्ञ होते. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. त्यांनी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योग या भारतीय दर्शनाचा परिचय करून देण्यात प्रमुख भूमिका निभावली. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते. भारतातील हिंदू सुधारणा चळवळीमध्ये ते प्रमुख होते. त्यांनी ब्रिटिशशासित भारतात राष्ट्रवाद आणण्यात योगदान दिले. विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. १८९३ मध्ये अमेरिकेच्या शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचा परिचय करून देतांना “माझ्या बंधू आणि भगिनींनो “या शब्दांनी सुरू केलेल्या त्यांच्या भाषणासाठी ते फार प्रसिद्ध झाले. स्वामी विवेकानंद हे त्यांच्या समकालीन भारतातील सर्वात प्रभावशाली तत्त्वज्ञ आणि समाज सुधारकांपैकी एक होते. आणि पाश्चात्य जगामध्ये वेदांताचे सर्वात यशस्वी मिशनरी होते. समकालीन हिंदू सुधारणा चळवळीमध्येही ते एक प्रमुख शक्ती होते. त्यांनी वसाहतवादी भारतातील राष्ट्रवादीच्या संकल्पनेत योगदान दिले. आधुनिक भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती आणि देशभक्त संत म्हणून त्यांना व्यापकपणे ओळखले जाते. त्यांचा जन्मदिवस भारतात “राष्ट्रीय युवा दिन” म्हणून साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे संयोजन- श्रावण अहिरे यांनी केले. कार्यक्रमाची सुंदर सजावट किरण गवळी, दीपमाला अहिरराव, भूपेंद्र साळुंखे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन- मनीषा बोरसे यांनी केले. शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.