पिंपरी :- विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राचा वापर केला जाणार आहे. यामध्ये ‘ईव्हीएम’वर (बॅलेट युनिटवर) उमेदवाराचा अनुक्रमांक, त्याचे नाव, पक्षाचे नाव, चिन्ह देण्यात येते. उमेदवाराचा फोटो देखील बॅलेट युनिटवर असणार आहे.
हे बॅलेट युनिट कंट्रोल युनिटला जोडण्यात येते. एका बॅलेट युनिटवर सोळा उमेदवारांची नावे बसतात. निवडणुकीला उभे असणा-या सर्व उमेदवारांची नावे टाकल्यानंतर सर्वात शेवटी बॅलेट युनिटवर ‘नोटा’चा पर्याय देण्यात येतो. मात्र, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रिंगणात पंधरापेक्षा जास्त उमेदवार उभे राहिले आहेत. पिंपरीत १८ उमेदवार आहेत. एका यंत्रावर १५ उमेदवार आणि ‘नोटा’चा पर्याय देणे शक्य आहे. त्यामुळे जास्त उमेदवार असल्याने आता या मतदारसंघातील प्रत्येक केंद्रावर दोन मतदान यंत्र (बॅलेट युनिट) वापरावी लागणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी-उंटवाल यांनी दिली.