पिंपरी चिंचवड – पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी (दि. 24) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती (म्हाळुंगे) बालेवाडी क्रीडा संकुल येथे होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रीडा संकुल परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल गुरुवारी सकाळी सहापासून मतमोजणी संपेपर्यंत असणार आहे.
हिंजवडीमधील वाहतुकीत बदल खालीलप्रमाणे –
– राधा चौक ते म्हाळुंगे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंद
– राधा चौक ते म्हाळुंगे गावाकडे जाणा-या रस्त्यावर सर्व प्रकारच्या पीएमपीएमल बसेस, खाजगी बसेसना प्रवेश बंद
-राधा चौकातून म्हाळुंगे गावात जाण्यासाठी राधा चौक ते म्हाळुंगे पोलीस चौकीच्या मागून इच्छित स्थळी जावे.
– राधा चौकातून म्हाळुंगे गावात जाणा-या कार, मोटारसायकल आणि नागरिकांना महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्याने हॉटेल हॉलिडे येथून क्रीडा संकुलाच्या मागील बाजूने जाण्याचा देखील मार्ग वापरता येणार आहे.
०००००००००
पिंपरी, भोसरी मतदारसंघाची 20 तर चिंचवडची 22 टेबलांवरुन होणार मतमोजणी
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील ईव्हीएम (मतदान यंत्रे) बालेवाडी क्रीडासंकुलातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहे. पिंपरी, भोसरी मतदारसंघाची 20 आणि चिंचवडची 22 टेबलांवरुन मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी असणार आहेत. तीनही मतदारसंघातील मतमोजणी कर्मचा-यांना बुधवारी प्रशिक्षण देण्यात आले.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 20 टेबल असणार आहेत. रिडर, राईटर, निरीक्षक आणि मदतनीस असे चार कर्मचारी एका टेबलवर कार्यरत असणार आहेत. ईव्हीएम ने-आण करण्यासाठी प्रत्येक टेबलवर एक कर्मचारी, नियंत्रण ठेवण्यासाठी पाच अधिकारी, ईव्हीएम देण्यासाठी आणि परत जागेवर ठेवण्यासाठी दहा कर्मचारी आणि नियंत्रणासाठी दोन नोडल अधिकारी, संगणक ऑपरेटर 20, नोडल अधिकारी, लिपिक, शिपाई असे कर्मचारी मतमोजणीसाठी कार्यरत असणार आहेत. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी केली जाणार आहे. सव्वाआठच्या सुमारास पहिला फेरी सुरु होईल आहे, असे निवडणूक निर्णय अधिका-यांनी सांगितले.
चिंचवड मतदारसंघ राज्यातील दुस-या क्रमाकांचा मोठा मतदारसंघ आहे. चिंचवड मतदारसंघातील मतमोजणी 22 टेबलांवरुन होणार आहे. प्रत्येक टेबलवर मतमोजणी पर्यवक्षेक, एक सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षक कार्यरत असणार आहेत. पोस्टल मतांची मोजणी करण्यासाठी स्वतंत्र टेबल असणार आहेत. मदतनीस, शिपाई कर्मचारी मतमोजणीसाठी तैनात असणार आहेत.
भोसरी मतदारसंघातील ईव्हीएमची मतमोजणी 20 टेबलांवरुन तर पोस्टलची मतमोजणी तीन टेबलवरुन होणार आहे. 20 टेबलकरिता 40 मतमोजणी पर्यवक्षेक कार्यरत असणार आहेत. पोस्टल बॅलेटसाठी तीन असे नऊ कर्मचारी आणि इतर कामासाठी 30 कर्मचारी कार्यरत असणार आहेत. एकूण सुमारे दीडशे कर्मचारी कार्यरत आहे. मतमोजणीच्या कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रेश्मा माळी यांनी दिली.