मुंबई – स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन करण्यात आले. रिजनल कॉम्प्रहेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप (आरसेप ) या कराराला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध आहे. या करारावर सह्या न करण्याची बुद्धी पंतप्रधानांना मिळावी म्हणून शेतकरी संघटनेने दूध फेकून आंदोलन केले. दरम्यान यावेळी पोलिसांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना ताब्यात घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉक आरसीईपी या करारावर सह्या करणार आहेत. त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटना जनता दल आणि सामाजिक संघटना विरोध करत आहेत. आग्नेय आशियाई राष्ट्र समूह आणि त्यांच्याशी व्यापारी भागिदारी असलेले भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, जपान व दक्षिण कोरिया यांचा समावेश असलेल्या देशांच्या गटातर्फे रिजनल कॉम्प्रहेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप (आरसेप) या व्यापार विषयक करारावर सोमवारी सह्या करण्यात येणार आहेत.
भारतातर्फे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉक येथे होत असलेल्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र, या करारातील तरतुदी या भारतीय शेतकऱ्यांच्या मुळावर येणार आहेत. कारण दुधासह अनेक गोष्टींवरचे आयात शुल्क कमी करावे लागणार असून त्यामुळे चीन, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड या देशातील मालाने भारतीय बाजारपेठा भरून जाणार आहेत. यामुळे आधीच मंदीच्या फेऱ्यात अडकलेला शेतकरी आणि इतर घटक आणखी अडचणीत येणार आहेत. त्यामुळे सध्याच्या स्थितीत या करारावर भारताने स्वाक्षरी करू नये अशी जनता दल तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे.