मुंबई : दीर्घावधीपासून मंदीचा सामना करीत असलेल्या वाहन उद्योगाला, सरलेल्या महिन्यांत सणोत्सवाच्या हंगामात सुधारलेल्या मागणीपायी अखेर वाढीची सुगी दिसली. मारुती सुझुकी, महिंद्र अँड महिंद्र आणि टोयोटा किलरेस्कर मोटर यांनी ऑक्टोबर महिन्यात विक्रीत वाढीचे आकडे नोंदविले आहेत.
प्रवासी वाहनांच्या क्षेत्रातील क्रमांक एकची कंपनी मारुती सुझुकीने ऑक्टोबरमध्ये देशांतर्गत १,४४,२७७ कारची विक्री नोंदविली आहे. ऑक्टोबर २०१८ मधील १,३८,१०० च्या विक्रीच्या तुलनेत यंदा ती ४.५ टक्क्यांनी वाढली आहे. उल्लेखनीय म्हणजे मागील सात महिन्यांत पहिल्यांदाच मारुतीला मासिक विक्रीत वाढीचा हा दिलासा दिसला आहे.
अन्य वाहन निर्मात्या कंपन्यांची विक्री वार्षिक तुलनेत अद्याप नकारात्मक असली तरी दसरा-दिवाळीतील खरेदीने त्यांच्या विक्रीतील मोठय़ा घसरणीला अटकाव घातला आहे. महिंद्रने ऑक्टोबर महिन्यात ४९,१९३ वाहनांची विक्री केली. ऑक्टोबर २०१८ मध्ये त्याची विक्री ५५,३५० इतकी होती, त्या तुलनेत यंदा ११ टक्क्यांची घसरण राहिली आहे. आधीच्या सप्टेंबर महिन्यातील ४०,६९२ विक्री संख्या आणि वार्षिक तुलनेत २१ टक्क्यांची घसरण पाहता, ऑक्टोबरची कामगिरी खूपच उजवी आहे, अशी कंपनीचीच प्रतिक्रिया आहे.
त्याचप्रमाणे टोयोटा किलरेस्करनेही ११,८६६ गाडय़ांची विक्री ऑक्टोबरमध्ये केली आहे. आधीच्या वर्षांतील १२,६०६ च्या विक्रीच्या तुलनेत त्यातील यंदाची घसरण ६ टक्क्यांची आहे. आधीच्या सप्टेंबर महिन्यात टोयोटा किलरेस्कर अवघ्या १०,२०३ गाडय़ांची विक्री शक्य झाली होती. नवागत एमजी मोटर इंडियाच्या ‘हेक्टर’ या एसयूव्हीची ऑक्टोबरमध्ये ३,५३६ इतकी विक्री झाली.
होंडा कार्स इंडिया लिमिटेडच्या गाडय़ांच्या ऑक्टोबर महिन्यातील विक्रीत २९.४४ टक्क्यांची घसरण दिसून आली. ऑक्टोबर २०१८ मधील १४,१८७ इतक्या विक्रीच्या तुलनेत यंदा १०,०१० गाडय़ा विकल्या गेल्या आहेत.
दुचाकी निर्मात्यांनाही सणोत्सवातील खरेदी फळलेली दिसून येत नाही. बजाज ऑटोने १३ टक्के घसरणीसह २,७८,७७६ची विक्री, तर टीव्हीएस मोटर कंपनीने २५.४५ टक्के घसरणीसह २,५२,६८४ दुचाकींची विक्री ऑक्टोबर महिन्यात नोंदविली आहे.