पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदासाठी पुढील अडीच वर्षासाठी सर्वसाधारण महिलेसाठी (खुला) आरक्षण राखीव झाले आहे. राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने आज (बुधवारी) मुंबईत राज्यातील महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर केली. त्यामुळे महापौरपद कोणाची महापौरपदी वर्णी लागणार याची उत्सुक्ता लागली आहे.
फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीतील महापालिका महापौरांचा अडीच वर्षाचा कार्यकाल १४ सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात आला होता. परंतु, विधानसभानिवडणुकीमुळे महापौरांना मुदतवाढ देण्यात आली होती. राज्य शासनाने २२ ऑगस्ट रोजी अध्यादेश काढून महापौरांना दिलेली तीन महिन्यांची मुदतवाढ २१ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षासाठीच्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत आज मुंबईत मंत्रालयात काढण्यात आली. त्यामध्ये पिंपरी चिंचवडचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी (खुला) राखीव झाले आहे. त्यामुळे आता महापौर कोण होणार याची उत्सुक्ता लागली आहे. २१ नोव्हेंबर रोजी महापौर, उपमहापौर निवडणूक प्रक्रिया पुर्ण होणार आहे. विद्यमान महापौर राहुल जाधव यांची मुदतवाढ २० नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे.