पिंपरी :- दापोडी येथे झालेल्या दुर्घटनेविषयीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्राद्वारे दिले आहे. त्या माहितीच्या आधारावर राज्य सरकारकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे. दरम्यान फुगेवाडी येथील दुर्घटनेच्या दिवशी बचाव यंत्रणाच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी अप्पर तहसीलदार गीता गायकवाड या देखील उपस्थित होत्या. या दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल त्यांनी निवासी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द केला असून त्या अहवालामध्ये देखील पालिकेच्या ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी संरक्षक कठडे लावले नसल्याचा ठपका ठेवला आहे. दापोडी येथे खड्ड्यात अडकलेल्या एका कर्मचाऱ्याला काढण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानासह दोघांचा मृत्यू झाला. दुर्घटना झालेल्या ठिकाणी खड्डा कशासाठी खोदण्यात आला होता, खड्डा खोदण्यास महापालिकेने परवानगी दिली होती की नाही; तसेच मृतांच्या कुटुंबियांना कोणत्या स्वरूपाची मदत देण्यात येणार आहे, आदी माहिती मागविण्यात आली आहे.
त्याआधारे राज्य सरकारकडे अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघांच्या कुटुंबियांना गरज भासल्यास अतिरिक्त मदत देण्याबाबत राज्य सरकारकडे मागणी केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. ही दुर्घटना घडल्यानंतर तहसीलदारांना घटनास्थळी पाठविण्यात आले होते. तहसीलदारांनी प्राथमिक अहवाल दिला आहे.