तळेगाव – तळेगाव ते आंबी एमआयडीसी या दोन गावांना जोडणारा जुना पुल पहाटेच्या सुमारास कोसळला आहे. ५० वर्षाहून अधिक काळ या पुलाला बनवून झाल्याने धोकादायक पूल म्हणून प्रशासनाने याआधीच जाहीर केले होते. तशा प्रकारचे सूचना फलक या पुलाच्या परिसरात लावण्यात आले होते. तरीदेखील वाहन चालक अवजड वाहनांचा वापर या पुलावरून सर्रासपणे करत होते. सुदैवाने ही घटना जेव्हा घडली त्यावेळेस पुलावरून एकही वाहन वाहतूक करत नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
आंबी तसेच तळेगाव एमआयडीसी मधील अनेक गावांना जोडण्यासाठी प्रशासनाकडून या आधी दुसऱ्या नवीन पुलाची निर्मिती करण्यात आली असल्याने वाहतुकीला कुठल्याही प्रकारचा अडथळा झालेला नाही. तळेगाव तसेच आंबी एमआयडीसीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे सुरळीत आहे.