चौफेर न्यूज – करोनामुळे शहरातील अभ्यासिका बंद आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र स्पर्धा परीक्षांची अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकाच बंद आहेत. त्यामुळे शहरातील सर्व अभ्यासिका सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांतून होत आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नियोजित परीक्षा स्थगित केल्या होत्या. मात्र ‘यूपीएससी’ने स्थगित केलेल्या परीक्षांच्या तारखा केल्या आहेत. त्याच धर्तीवर ‘एमपीएससी’ने स्थगित केलेल्या परीक्षा जाहीर करावी, अशी मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून होत होती. त्या पार्श्‍वभूमीवर ‘एमपीएससी’ने राज्य सेवा परीक्षा 13 सप्टेंबरला होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

तथापि, लॉकडाऊन लागू केल्याने बहुतांश स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमदेवार गावी गेले आहेत. गावी जाता न आलेल्या उमेदवार खोलीवरच अभ्यास करीत आहेत. तसेच गावी गेलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुण्यात यायचे आहे. मात्र अभ्यासिका बंद असल्याने अभ्यास कुठे करायचा, असा प्रश्‍न आहे. त्यामुळे शहरातील अभ्यासिका सुरू होणे आवश्‍यक आहे, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात एमपीएससी स्टुडंट राइट्‌सचे महेश बडे आणि किरण निंभोरे यांनी गुरूवारी महापालिका आयुक्‍त शेखर गायकवाड यांना निवेदन दिले आहे. शाळा ज्या प्रमाणे टप्प्याने सुरू करीत आहात, त्यासाठी जे नियम व अटी तयार करण्यात आले आहेत, त्याच अटींसह अभ्यासिका सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. स्पर्धा परीक्षा उमेदवारांकडे अभ्यासाठी खूप कमी वेळ उपलब्ध आहेत. त्यामुळे अभ्यासिका सुरू करण्याबाबत तातडीने निर्णय व्हावा आणि लवकरात लवकर अभ्यासिका सुरु कराव्यात व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here