चौफेर न्यूज – सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्याद्वारे मैत्री आणि त्यानंतर आर्थिक फसवणूक होत असल्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा भामट्यांपासून सावध राहण्याचे महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आवाहन केले आहे.

सध्या नागरिक आपल्या दैनंदिन जीवनातील बराच वेळ इंटरनेट सर्किंग आणि प्रामुख्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घालवत आहेत. त्यात फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइन, टिकटॉक इत्यादींचा समावेश आहे. सायबर भामट्यांनी सध्या याच गोष्टीचा फायदा घेत सर्वसामान्य नागरिकांना ऑनलाईन आर्थिक फसवणुकीसाठी एक नवीन युक्ती शोधली आहे.

सायबर भामटे नागरिकांच्या सोशल मीडियावरील विशेषतः फेसबुकवर पाळत ठेवतात. मग एखाद्या परिचित व्यक्तीच्या सोशल मीडियावरील उपलब्ध फोटोज व अन्य माहितीच्या आधारे त्याचे फेक प्रोफाईल बनवितात. त्यावरून तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवितात. फ्रेंड रिक्वेस्टसोबत एक मेसेज पण येतो. त्यात माझा आधीचा अकाउंट हॅक झाल्यामुळे हा नवीन अकाउंट आहे’ असे म्हटलेले असते. सर्वसामान्य नागरिक यावर विश्वास ठेवून ती फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतात. नंतर या अकाउंटवरून कधी तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर एखादे चुकीचे ऍप डाउनलोड करायला सांगितले जाते.

आपण तसे केल्यास मोबाईल किंवा लॅपटॉपचा कंट्रोल या सायबर भामट्यांकडे जातो. ते त्याद्वारे तुमचा सर्व डेटा घेऊ घेतात. त्यानंतर बँक खात्यातील पैसे दुसरीकडे ट्रान्स्फर करून आर्थिक फसवणूक करतात.

सावध रहा!

सोशल मीडिया विशेषतः फेसबुक वापरताना सावध राहा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारु नका. तसेच आपल्या सर्व फोटोज व फोटो अल्बमची प्रायव्हसी सेटिंग अपडेट करा. त्यामुळे कोणीही तुमचे फोटो डाऊनलोड करू शकणार नाहीत.

अन्य मार्गाने संभाषण करा.

ती रिक्वेस्ट त्या व्यक्तीनेच पाठविली आहे याची खात्री करा व मगच स्वीकारा.अन्यथा ते प्रोफाईल ब्लॉक करा.फक्त सोशल मीडियावर नाही तर आपल्या परिचित किंवा मित्र यादीतील व्यक्तींबरोबर ई-मेल, व्हाट्स अपद्वारे किंवा फोन करून संपर्कात राहा.

तुम्ही जर एखाद्या अशा प्रकारच्या गुन्ह्यात फसविले गेले असाल तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करा. http://www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर देखील त्याची नोंद करा, असे आवाहन महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here