चौफेर न्यूज – पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असला तरी मुंबईतील बहुसंख्य एसएससी बोर्डाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा सुरू आहेत. काही शाळांनी एप्रिलच्या दुसऱया आठवडय़ापासून परीक्षांचे आयोजन केले आहे, तर सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षा संपून पुढील शैक्षणिक वर्षाला सुरुवातदेखील झाली आहे.

गेल्या शनिवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा न घेता तसेच त्यांचे मूल्यमापन न करता त्यांना वरच्या वर्गात प्रवेश देण्याची घोषणा केली. मात्र या आदेशाची लेखी प्रत सोमवारपर्यंत शाळांमध्ये पोहोचली नसल्याने ज्या शाळांमध्ये परीक्षा सुरू आहेत त्यांनी नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा होणार असल्याचे विद्यार्थ्यांना कळविले आहे. परीक्षा न घेण्याच्या लेखी सूचना शिक्षण विभागाकडून मिळाल्या नसल्याचे काही मुख्याध्यापकांकडून सांगण्यात आले.

शिक्षण विभागाने तातडीने परिपत्रक जाहीर करावे

वार्षिक परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना पास करण्याच्या निर्णयाविषयी शिक्षण विभागातील अधिकाऱयांनी लवकरात लवकर परिपत्रक जाहीर करून ते शाळांना पाठवावे, अशी मागणी शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांनी केली. शिक्षण विभागाकडून लेखी सूचना मिळाल्याशिवाय शाळा कोणत्याही तोंडी निर्णयाची अंमलबजावणी करणार नाही, असेही ते म्हणाले.

पालकांमध्ये नाराजी; शाळा, शिक्षण विभागात समन्वय नाही

शिक्षणमंत्र्यांनी स्वतः सोशल मीडियावर परीक्षा न घेण्याविषयीचा निर्णय जाहीर करूनही काही शाळा परीक्षांचे आयोजन करीत असल्याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाळा आणि शिक्षण विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे काही पालकांनी सांगितले. परीक्षा रद्द झाल्याचा दिलासा मिळालेले मुंबई, पुण्यातील पालक कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी गावी जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र शाळांकडून परीक्षा रद्द करणे किंवा उन्हाळी सुट्टीसंदर्भात कोणत्याही सूचना न मिळाल्याने पालकांची पुरती कोंडी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here