चौफेर न्यूज – प्रथम वर्ष एलएलएमची पहिली सत्र परीक्षा 17 मेपासून सुरू होणार आहे. मात्र अजूनही एलएलएम अभ्यासक्रमाची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरूच आहे. प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊन लेक्चर्स कधी होणार, अभ्यास कधी करणार याची चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे.

एलएलएम प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी पार पडल्यावर ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली. जून 2020 मध्ये शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निदान ऑनलाइन लेक्चर्सला तरी सुरुवात होणे आवश्यक होते. मात्र पहिली सत्र परीक्षा तोंडावर आले तरी अद्याप विद्यार्थ्यांचे प्रवेशच सुरू आहेत. एलएलबी या पदवी अभ्यासक्रमानंतर दोन वर्षांचा एलएलएम हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या वतीने शिकवला जातो. विद्यापीठांतर्गत सुमारे 800 विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असतात, पण या विद्यार्थ्यांसाठीही प्रवेशप्रक्रिया राबवणे विद्यापीठाल शक्य नाही का , असा सवाल विचारला जात आहे.

लॉ स्टुडंट असोसिएशनचे अॅड. सचिन पवार यांनी सांगितले, एलएलएम अभ्यासक्रमाच्या दोन परीक्षा होतात. वर्ष संपायच्या तोंडावर पहिली सत्र परीक्षा घेतल्यावर दुसरी सत्र परीक्षा पुढील शैक्षणिक वर्षात घ्यावी लागेल. विद्यापीठाने प्रवेशप्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल या दृष्टीने अभ्यासक्रम शिकवायला सुरुवात करावी, अशी मागणीही अॅड. पवार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here