चौफेर न्यूज – इयत्ता दहावीची परीक्षा रद्द झाली तरी बारावीची परीक्षा उशिरा का होईना, पण ती होणारच, असे संकेत मिळू लागले आहेत. पुढील प्रवेशासाठी सीईटी, नीट तसेच बारावीच्या परीक्षेतील गुणही महत्त्वाचे असतात. (CET,NEET) त्यामुळे परीक्षा होईलच, अशी चिन्हे आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार २३ एप्रिलपासून बारावीची परीक्षा सुरू होणार होती. कोरोनामुळे ती पुढे ढकलली. दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली; मग बारावीच्या परीक्षेचे काय, अभ्यास सुरू ठेवायचा की नाही, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसमोर आहे. परीक्षा केव्हा, याचा काही नेम नाही.

जूनमध्ये कोराना रुग्णांची संख्या कमी झाल्यास परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होऊ शकते. कोल्हापूर विभागात कोल्हापूरसह, सांगली तसेच सातारा जिल्ह्याचा समावेश होतो. बारावीच्या परीक्षेला सुमारे एक लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेले वर्ष कोरोनाच्या संकटात गेले. ऑनलाईन अभ्यासक्रमात अनेक अडचणी निर्माण झाल्या. कनिष्ठ महाविद्यालये सुरू होतात न होतात तोपर्यंत कोरोनाचे संकट पुन्हा उभे राहिले. धड ऑनलाईन नाही आणि ऑफलाईनही नाही, अशी अवस्था झाली.

परीक्षा पुढे गेल्याने अभ्यासात खंड पडला. परीक्षा होईल की नाही, अशी संभ्रमावस्था आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सीईटी आणि नीट परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला १२ वीचा अभ्यासक्रम असतो. १२ वी बोर्ड परीक्षेत ५० टक्के गुण मिळाले तरच या परीक्षांमधील गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातात. त्यामुळे बारावी परीक्षा बंधनकारक असते. कोरोनाचा कहर वाढत असताना बारावी परीक्षा कशाप्रकारे घेणार, याचे आव्हान राज्य मंडळासमोर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here