चौफेर न्यूज – देशातील कोरोना परिस्थितीचा विचार करून विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परीक्षांसंदर्भातील निर्णय विद्यापीठांवर सोडला आहे. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा वगळून इतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यापूर्वी स्थानिक कोरोना परिस्थितीचा आढावा घ्या किंवा विद्यार्थ्यांना थेट वरच्या वर्गात घाला असे निर्देश ‘यूजीसी’ने दिले आहेत. या निर्देशानंतर देशातील बहुतांश विद्यापीठांनी पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना वरच्या वर्गात प्रमोट करण्यास सुरुवात केली आहे.

विद्यापीठे या स्वायत्त संस्था असल्याने त्यांना परीक्षा आणि शैक्षणिक सत्रांबाबत त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याचा अधिकार आहे असे ‘यूजीसी’चे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी म्हटले आहे. देशातील राज्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव कमीअधिक आहे. अशा परिस्थितीत ‘यूजीसी’नेही परीक्षांबाबत अद्याप काही गाईडलाईन्स बनवलेल्या नाहीत. त्यामुळे परीक्षा न घेता प्रथम व दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षातील कामगिरीच्या आधारावर प्रमोट केले जात आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलैऑगस्टमध्ये

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे क्रमप्राप्त आहे. त्या जुलै किंवा ऑगस्टमध्ये घेण्याची तयारी ‘यूजीसी’ने सुरू केली आहे. त्याबाबत जूनच्या पहिल्या आठवडय़ात कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊनच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here