चौफेर न्यूज – कोरोना आणि लॉकडाऊन अशा दुहेरी संकट संपूर्ण देशावर ओढावलं आहे .शाळा बंद असल्याने मिळकत बंद झाली आणि परिणामतः अनेक इंग्रजी शाळा बंद करण्याचा निर्णय संस्था चालक घेत आहेत.औरंगाबाद शहरातही याचा परिणाम दिसू लागला आहे शिक्षणव्यवस्था आगामी काळात पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे. कारण, लॉकडाऊनमुळे आर्थिक तोट्यात असलेल्या औरंगाबादमधील ४० टक्के इंग्रजी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

दोन वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून मिळणारे शैक्षणिक शुल्क ( फी) जवळपास बंद आहे. शिक्षकांचे पगार, शाळेच्या जागेचे आणि वाहनांचे भाडे थकले आहे. परिणामी आता या इंग्रजी शाळांच्या चालकांनी हा व्यवसाय बंद करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे हजारो शिक्षक आणि कर्मचारी बेरोजगार होणार आहेत.

शाळेच्या पायाभूत सुविधांसाठी इंग्रजी शाळांनी बॅंकाकडून घेतलेले कर्ज, स्कूल व्हॅनचे हप्ते यामुळे संस्थाचालक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे आता संस्थाचालक शाळा बंद करण्याची प्रक्रिया काय हे जाणून घेण्यासाठी शिक्षण विभाग कार्यालयाच्या चकरा मारत आहेत! शिक्षण विभागाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यातील तब्बल ४० टक्के शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

शाळा बंदमुळे मिळकत पूर्णपणे थांबलेली आहे. त्यामुळे बॅंकेचे हप्ते थकले आहे. कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी शाळेतील स्कूलबस, व्हॅन विक्री करून हप्ते भरणे सुरू आहे. कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी काही संस्थाचालकांनी शाळा विक्रीसाठी देखील काढल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here