चौफेर न्यूज – भारतात कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट सुरु आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. देशातील कोरोना स्थितीचा आढावा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मध्ये एक बैठक झाली होती. त्या बैठकीत सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला. देशातील स्थिती पाहता बारावीच्या विद्यार्थ्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडं घातलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विद्यार्थी #modiji_cancel12thboards ही मोहीम चालवत आहेत.

बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय कधी?

सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या गेल्या त्यावेळी 1 जूनला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, लांबणीवर पडलेली परीक्षा आणि कोरोनाच्या स्थितीमुळे विद्यार्थ्यांनी आता थेट नरेंद्र मोदी यांना बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टात बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासाठी एक याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांकडून ट्विटरवर मोहीम

कोरोनाची परिस्थिती पाहता बारावीचे विद्यार्थी आता ट्विटरवर सक्रिय झाले आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर #modiji_cancel12thboards ही मोहीम सुरु केली आहे. याद्वारे विद्यार्थी आवाज उठवत आहेत. बारावीच्या काही विद्यार्थ्यांनी दहावीच्या धर्तीवर परीक्षा रद्द करुन निकाल जाहीर करावा, अशी भूमिका घेतली आहे. विद्यार्थी विविध प्रकारचे मीम्स बनवून देखील आवाज उठवतं आहेत.

बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

कोरोना विषाणू संसर्गामुळं सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डानं दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये वकील ममता शर्मा यांनी याचिका दाखल केली आहे. ममता शर्मा यांनी बारावीची परीक्षा रद्द करुन निकाल जाहीर करण्याची मागणी केलीय. बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी वस्तूनिष्ठ पद्धत अंमलात आणावी, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here