चौफेर न्यूज – सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. केंद्रीय माध्‍यमिक शिक्षण बोर्ड, सीबीएसई आज बारावी बोर्ड परीक्षांबाबत आज महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. देशभरातील कोरोनाची गंभीर स्थिती पाहता परीक्षा रद्द होऊ शकते. आज केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक सर्व राज्यांच्या शिक्षण सचिवांसोबत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ऑनलाईन बैठक घेणार आहेत. या बैठकीत राज्‍यांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारावर शिक्षण मंत्रालय सीबीएसई बारावीच्या बोर्ड परीक्षेबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.

बारावी परीक्षेबाबत सीबीएसईचा गांभीर्याने विचार
परंतु केंद्रीय माध्‍यमिक शिक्षण बोर्डाने आधीच 1 जून रोजी सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षेवर अंतिम निर्णय घेण्याची तारीख ठरवली आहे. परंतु सगळीकडूनच सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याची मागणी होऊ लगाल्याने शिक्षण बोर्ड यावर गांभीर्याने विचार करत आहे. दरम्यान सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द होणार असल्याच्या वृत्ताचा बोर्डाने आधीच इन्कार केला आहे.

आजच्या बैठकीकडे विद्यार्थ्यांच्या नजरा
आता विद्यार्थ्यांच्या नजरा केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश निशंक यांच्या सर्व राज्यांच्या शिक्षण सचिवांसोबत होत असलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सकडे लागली आहे. यामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गादरम्यान परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन घ्यायची यावर चर्चा होणार आहे. जर सीबीएसई बारावी बोर्डाची परीक्षा जून अखेरीस किंवा जुलैच्या मध्यात करण्यावर राज्यांची सहमती झाली तर परीक्षा रद्द करण्याच्या सर्व शक्यतांना पूर्णविराम लागेल.

राज्‍यांचे सचिव अभिप्राय देणार
देशभरातील अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्गामुळे परिस्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत राज्याचे शिक्षण सचिव देखील सीबीएसई बारावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा सल्ला देऊ शकतात. शिक्षणमंत्री निशंक आज शिक्षण सचिवांसोबत नवं शिक्षण धोरण, ऑनलाईन अभ्यासासह अनेक मुद्द्यांवरही चर्चा करणार आहेत. मात्र या सगळ्यात सीबीएसई बारावी बोर्डाच्या परीक्षा कशी घ्यावी, किंवा रद्द करावी याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here