चौफेर न्यूज – शैक्षणिक वर्ष संपवून उन्हाळी सुट्टीची केलेली घोषणा, शिक्षकांच्या दिलेल्या कोरोना कामाच्या नेमणुका तर बालमानसशास्त्राचा विचार करुन स्वाध्याय उपक्रम तात्पुरता स्थगित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन प्राथमिक विभागाचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी शिक्षण संचालकांना पाठविले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

गेल्या वर्षभर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय (स्टुडन्ट व्हाट्सअप बेस डिजिटल होम असेसमेंट योजना) उपक्रम शिक्षकांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील शाळांमध्ये यशस्वीपणे राबवण्यात आले आहे.

गेली वर्षभर विद्यार्थी प्रामुख्याने ऑनलाईन, ऑफलाइन शिक्षण घेत आहे. 30 एप्रिल 2021 च्या पत्रान्वये दि.2 मे ते 14 जून पर्यंत उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आलेली आहे. बालमानसशास्त्राचा विचार करता उन्हाळी सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रम देणे अयोग्य आहे.

याच काळावधीत शिक्षकांना कोरोना सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. तसेच चेक पोस्टवर आणि अन्यठिकाणी शिक्षकांना नेमणुका दिलेल्या आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागात कोणतेही शैक्षणिक वातावरण नाही.

अशा परिस्थितीत 15 मे पासून पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय उपक्रम राबवणे संबंधी सूचना देण्यात आलेल्या आहेत.

विद्यार्थी पालक व शिक्षकांचे मानसिकतेचा विचार करून विद्या प्राधिकरणातर्फे राबविण्यात येणारा स्वाध्याय उपक्रम सध्या तात्पुरता स्थगित करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here