चौफेर न्यूज – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे दि.24 जूनपासून घेण्यात येणार्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा आता 16 ऑगस्टपासून घेण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
कोरोनामुळे नियमित अभ्यासक्रमाच्या विद्यापीठांसह आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांवरही परिणाम झाला आहे. उन्हाळी सत्र 2021 मधील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा संदर्भात अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीस विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.नितीन करमळकर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरव विजय, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले की, कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या परीक्षा थोड्या कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या. परीक्षेच्या तयारीकरीता विद्यार्थ्यांना 45 दिवसांचा कालावधी मिळेल. ज्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिली आहे; परंतु, प्रात्यक्षिक परीक्षेआधी ज्या विद्यार्थ्यांचा कोविड-19 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशा विद्यार्थ्यांची विलगीकरण कालावधीनंतर स्वतंत्रपणे त्याच प्रात्यक्षिक परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येतील. तसेच जे विद्यार्थी लेखी परीक्षेपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह झालेे. लेखी परीक्षा देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांची पुर्नःपरीक्षा घेण्याबाबत सर्व संबंधितांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या ऑनलाईन बैठकीस उपस्थितांचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी आभार मानले. वेळापत्रक लवकरच www.muhs.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.
कोरोनासंबंधी शासनाने केलेल्या सर्व नियमांचे पालन करुन लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात याव्या. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी ई-पास म्हणून विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे प्रवेशपत्र वितरीत केले जाणार आहे, त्यालाच ई-पास ऐवजी मान्यता देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.