चौफेर न्यूज – ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गेले वर्ष ऑनलाईन शिक्षणाविना घरातच गेले. यंदाही तीच परिस्थिती दिसत आहे. दुसरीकडे, या विद्यार्थ्यांच्या बहुतांशी पालकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे त्यांच्याकडे तशी साधनेही उपलब्ध नव्हती. त्यामुळे ते विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले. या विद्यार्थ्यांचा पायाच जर कच्चा राहिला, तर त्यांच्या भवितव्याची कोण हमी देणार, हा प्रश्न पालकांना सतावत आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे जूनपासून शाळा उघडल्याच नाहीत. त्यानंतर शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सहावीच्या पुढील वर्गासाठी ऑनलाईन तासिका सुरु करण्यात आल्या. सुरुवातीला पूर्वप्राथमिक, प्राथमिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे की नाही, या वादात चार- पाच महिने निघून गेले. त्यानंतर पहिलीपासूनच्या वर्गांनाही ऑनलाईन शिक्षण सुरु झाले; पण ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या बहुतांशी पालकांकडे ‘स्मार्ट मोबाईल’ अथवा लॅपटॉप, संगणक या साधनांचा अभाव असल्यामुळे ही मुले ऑनलाईन शिक्षणापासून दूरच राहिली. जिल्ह्यात ‘आरटीई’ अंतर्गत ६०३ शाळांनी नोंदणी केलेली आहे. यामध्ये राज्य मंडळासोबत काही ‘सीबीएसई’ शाळांचाही समावेश आहे. यंदा वंचित घटकांतील ११ हजार ८६१ पालकांनी मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज केले होते. यापैकी एप्रिल महिन्यात ३ हजार ६२४ विद्यार्थी सोडत पद्धतीने प्रवेशासाठी पात्र ठरले. ११ जूनपासून या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन त्यांना संबंधित शाळा प्रवेश देणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here