चौफेर न्यूज
– राज्यशासनाने येत्या सोमवार ( दि. 4 ऑक्टोबर ) पासून करोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी करून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात शाळा सुरू करण्याबाबत प्रशासन संभ्रमात आहे. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी असा मतप्रवाह असून काही पालक तिसऱ्या लाटेच्या भितीने दिवाळी नंतर शाळा सुरू करावी अशी मागणी करत आहेत. परिणामी महापालिका प्रशासनसही संभ्रमात असून या निर्णयाची अंमलबजावणीची वेळ आली तरी पालिका प्रशासनाने अद्याप त्याबाबत निर्णय घेतलेला नाही.
राज्यशासनाने मागील आठवडयात शहरी भागात 8 वी ते 12 चे वर्ग करोना प्रतिबंधात्मक नियम तसेच पालकांचे संमतीपत्रक घेऊन शाळा सुरू करण्यात मुभा दिली आहे. मात्र, त्याच वेळी हे अधिकार स्थानिक प्रशासनास दिले आहे. पुणे शहरात पाच महिन्यांपूर्वी करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर घातला होता. तर गणेशोत्सवानंतर शहरात करोनाची तिसरी लाट येईल अशी भिती व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात शहरातील रूग्णसंख्या कमालीची घटली असून लसीकरणही वेगाने सुरू आहे. त्यामुळे, रूग्न संख्या शहरात स्थिरावली आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयानुसार, शाळा सुरू करण्यासाठी पालकांकडून तयारी दर्शविली जात आहे तर काही पालक तिसऱ्या लाटेच्या भितीने दिवाळी पर्यंतची वाट पहावी अशी भूमिका घेत आहेत. परिणामी महापालिका प्रशासनही संभ्रमात असून आज ( शनिवारी) सायंकाळी याबाबत महापालिकेकडून निर्णय जाहीर केला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.