चौफेर न्यूज – करोनामुळे दीड वर्ष शाळा बंद होत्या. आता सुरू होताच अभ्यासक्रम पूर्ण करण्याची व परीक्षेची घाई करू नका. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्यातील भीती दूर करा. गाणी, खेळ यासह इतर विविध उपक्रम राबवून त्यांचे मन शाळेत रमू द्यावे, असा सूर विविध शिक्षण तज्ज्ञांनी ऑनलाइन चर्चासत्रात व्यक्‍त केला. दरम्यान, पहिली ते चौथीचे वर्गही दिवाळीनंतर सुरू करा, अशी मतेही चर्चासत्रात व्यक्‍त करण्यात आली आहेत.

राज्यात 4 ऑक्‍टोबरपासून शाळा सुरू करण्यासंदर्भात आवश्‍यक सूचना देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ऑनलाइन चर्चासत्र घेण्यात आले. यात कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. समीर दलवाई, शिक्षणतज्ज्ञ हेमांगी जोशी, माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांनी मार्गदर्शन केले. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संचालक राहूल द्विवेदी, विद्या प्राधिकरणाचे संचालक एम. डी. सिंह, प्राचार्य विकास गरड सहभागी झाले होते.

शाळा सुरू करण्यासाठी पूर्व तयारी करा, विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रक तयार करा, मुले बिचकतील, घाबरतील असे काही करू नका. शिक्षकांनी समूपदेशकांची भूमिका बजावावी लागणार आहे, असे डॉ. समीर दलवाई यांनी सांगितले.

शाळा सुरू करण्याचा झालेला निर्णय हा आंनदोत्सव साजरा करण्यासारखाच आहे. पोषण आहार योजनाही नियोजनपूर्वक राबवायला पाहिजे. दहावी व बारावीच्या परीक्षा कशा घ्यायच्या याचेही नियोजन करण्याची गरज आहे, असे वसंत काळपांडे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचा शाळेत स्वागतोत्सव
मुलांचे आरोग्य व सुरक्षितता याला प्राधान्य देत शाळा होणार आहे. हे करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. विद्यार्थ्यांसाठी जल्लोषात स्वागतोत्सव साजरा करा. विद्यार्थ्यांची मानसिकता व वातावरणाचा विचार करूनच विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. शिक्षक, कर्मचाऱ्यांनीही लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here