चौफेर न्यूज – राज्यातील महाविद्यालये सुरु होणार की नाही याबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्याचे पालकमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजपासून महाविद्यालये सुरु करण्यात येणार असल्याचे जाहिर केले. मात्र विद्यार्थी महाविद्यालयात गेले असता त्यांना महाविद्यालयाची दारं बंद दिसली.
पुणे शहरातील महाविद्यालयांना या संदर्भात कुठलीच अधिकृत माहिती प्राप्त न झाल्यामुळे महाविद्यालये सुरू झाली की नाही या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यावर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे.
उदय सामंत म्हणाले की, पुण्यातील एक-दोन महाविद्यालयात संभ्रम झाला आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीबाबत बैठक घेतल्यावर पुण्यातील महाविद्यालये सुरू करण्याचे म्हणाले होते.
उद्या या संदर्भात सर्व कुलगुरूंसोबत चर्चा करुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बोलणार आहे. त्यानंतर उद्या किंवा परवा महाविद्यालये सुरू कऱण्याच्या संदर्भात निर्णय जाहीर करण्यात येईल. असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.