चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव कमी झाल्याने महापालिका क्षेत्रातील १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळा अर्ध सत्र कालावधीत तर ९ वी, १० वीच्या शाळा आणि १२ वी पर्यंतचे महाविद्यालये १ फेब्रुवारी २०२२ पासून नियमित सुरु होणार आहेत. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती शाळा प्रमुखांनी घेणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे.
पुणे जिल्हयात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना नियमांचे पालन करुन जिल्हयातील शाळा ०१ फेब्रुवारीपासून सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शाळा सुरु करण्याचा आदेश काढले आहेत.
आयुक्तांचे आदेश खालील प्रमाणे..
१) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वी चे वर्ग (अर्ध सत्र कालावधीत) दिनांक ०१.०२.२०२२ पासून सुरु करणेस परवानगी राहील.
२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता ९ वी ते १२ वी चे नियमित वर्ग दिनांक ०१.०२.२०२२ पासून सुरु करणेस परवानगी राहील.
३) शाळा सुरु करणेबाबत मा. महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचेकडील दिनांक ०७.०७.२०२१, दिनांक १०.०८.२०२१, दिनांक २४.०९.२०२१ रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना / अटी (SOP) व दिनांक २९.११.२०२१ रोजी मा. महाराष्ट्र शासन परिपत्रकातील अतिरिक्त मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
४) शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करणेकामी Thermometer. Thermal Scanner / Gun, Pulse oximeter, जंतुनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तूंची उपलब्धता करण्यात यावी.
५) शाळेतील ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे कोविड १९ लसीकरणाचे २ मात्रा (डोस) पूर्ण झाले नाहीत, अशा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना ४८ तासापूर्वीची RT-PCR चाचणी बंधनकारक असून त्याबाबतचे प्रमाणपत्र शाळेत दफ्तरी ठेवण्यात यावे.
६) शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्यात यावे.
७) वर्ग खोली तसेच स्टाफरूम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर (Physical Distance) च्या नियमानुसार असावे.
८) शाळेत दर्शनी भागावर (Physical Distance), मास्कचा वापर इत्यादी संदर्भात मार्गदर्शक सूचना Poster / stickers लावण्यात यावे, शाळेच्या अंतर्गत व बाहय परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान ६ फुट इतकी शारीरिक अंतर (Physical Distance) राखले जाईल याकरिता विशिष्ठ चिन्हांकन करण्यात यावे, शारीरिक अंतर (Physical Distance) राखण्यासाठी घेण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणा-या बाणाच्या खुणा करण्यात याव्यात, याबाबतची व्यवस्था शाळेने करणे आवश्यक राहील.
९) विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करून घ्यावी.
१०) शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखण्याकरिता शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ करण्यात यावा. स्वच्छतागृहाचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे. याबाबत शाळेच्या मुख्यध्यापकांनी खात्री करून घेणे आवश्यक राहील.
११) संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
कोविड १९ च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६०, तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील. सदर आदेश दि. ०१.०२.२०२२ पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील असे आयुक्त राजेश पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.