चौफेर न्यूज – शहरात गेल्या काही दिवसामध्ये लहान बालकांमध्ये गोवर या संसर्गजन्य रोगाची लक्षणे वाढताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये देखील खबरदारी घेणे गरजेचे आहे असून शहरात या रोगावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र गोवर आयसोलेषण सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, सध्या महापालिकेतर्फे लोकवस्तीमध्ये करण्यात येत असलेले सर्वेक्षणाचे कामास गती देणे आवश्यक आहे. तसेच यावर लागणाऱ्या औषध साठा, वैद्यकीय साहित्य शहरातील महापालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध करून देण्यात यावे. गोवर हा संसर्गजन्य रोगाचा प्रकार असून त्याचा प्रसार फार वेगाने होत आहे. शहरातील महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालय, इतर रुग्णालयामध्ये विविध आजारावरती शहरातील व परिसरातील नागरिक उपचार घेत असून त्यामुळे सर्व रुग्ण एकाच जागी येत असल्याने गोवर हा संसर्गजन्य रोग असल्याने या बाधित रुग्णाच्या संपर्कात इतर रुग्ण आल्यास या आजाराचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून पिंपरी चिंचवड शहरात गोवर आयसोलेषण सेंटर उभारणे आवश्यक आहे. जेणेकरून गोवर या आजाराबाबत होणारया सर्व तपासण्या एकाच ठिकाणी होतील. शहरातील इतर आजारावरती उपचार घेणाऱ्या रुग्णांना याचा त्रास होणार नाही व गोवर नियंत्रणात येण्यास मदत होईल. तरी, गोवर या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव पाहता या रोगावर प्रतिबंधात्मक योग्य उपाययोजना व खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित मनपा वैद्यकीय विभागाला करण्यात याव्या, शहरात या रोगावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र गोवर आयसोलेषण सेंटर उभारण्यात यावे, अशी विनंती नाना काटे यांनी केली आहे.