चौफेर न्यूज – महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे विधान करणा-या भारतीय जनता पार्टीचे नेते, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज (शनिवारी) चिंचवडगावात कार्यक्रमासाठी आलेल्या पालकमंत्री पाटील यांच्या तोंडावर शाई फेकण्यात आली.
चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी -चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित 461 व्या श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री पाटील आले आहेत. या पार्श्वभूमीवर विविध समाज संघटनानी आक्रमक होत आंदोलन केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दिवंगत माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन दरम्यान, पालकमंत्री पाटील हे भाजपचे माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्या निवासस्थानी गेले होते. निवासस्थानातून बाहेर पडताना त्यांच्या तोंडावर शाईफेक करण्यात आली आहे. शाई नेमकी कोणी फेकली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. फुले, आंबेडकर आणि कर्मवीर हे अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, अशा आशयाचे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते.