चौफेर न्यूज :- खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. तर, सरकारने याची दखल घेत संपात सहभागी होणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाई करण्याच्या इशारा दिला आहे.
अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्यास विरोध करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या ३० संघटनांनी मंगळवारी रात्रीपासून ७२ तासांचा म्हणजेच तीन दिवसांचा संप पुकारला आहे. यातच संप करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना राज्य सरकराने आता नोटीस बजावली आहे. तीन दिवसीय संपामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास, मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर २४ तास सज्ज आहे. काही तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व संपाच्या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
संपकाळात सुरळीत वीजपुरवठ्यास सर्वोच्च प्राथमिकता देण्यासाठी महावितरणकडून पर्यायी स्वरुपात मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत आहे. संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्य स्त्रोत कर्मचारी, महावितरणचे अप्रेंटिस, विद्युत सहायक, प्रशिक्षणार्थी अभियंता, देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या निवड सूचीवरील कंत्राटदारांचे कर्मचारी यांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. बाह्य स्त्रोत कंत्राटदारांना अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे. संपकाळामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी प्रत्येक विभागात निवडसूचीवर असलेल्या सर्व कंत्राटदारांना आवश्यक साधनसामुग्री, मनुष्यबळ व वाहनांसह संबधीत कार्यालयांमध्ये उपलब्ध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच महावितरणकडून वितरण रोहीत्र, ऑईल, वीजतारा, केबल्स, वीजखांब, फिडर पिलर्स, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सेस, वाहतुकीसाठी वाहने आदी आवश्यक साधनसामुग्री महावितरणच्या विविध कार्यालयांमध्ये उपलब्ध ठेवण्यात आली आहे.