चौफेर न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊन काळात अनेक शिक्षण संस्थांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यातच राज्यातील स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यंसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. अशात MPSC च्या मुलांना मागील सहा महिन्यांपासून विद्यावेतन मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांनी पुण्यातील बार्टी या संस्थेच्या कार्यालयाजवळ गुरुवार पासून (दि.6) आंदोलन सुरु केले आहे.

मागील सहा महिन्यापासून बार्टी या संस्थेने 400 विद्यार्थ्याना मानधन दिले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी गुरुवार पासून बार्टीच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे. बार्टी या संस्थेकडून MPSC करणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दरमहा नऊ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी संस्थेच्या वरिष्ठांकडे अर्ज देखील केला आहे.

काय म्हटले आहे अर्जात ?

विद्यार्थ्यांनी दिलेल्या अर्जामध्ये म्हटले आहे की, कोव्हिडी-9 मुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे आमचे राहिलेले प्रशिक्षण बंद झाले आहे. परंतु बार्टीने ऑनलाइन प्रशिक्षण देण्यास संमती दिल्यामुळे आम्ही ऑनलाइन प्रशिक्षण घेतले. मागच्या अनेक महिन्यापासून प्रचंड आर्थिक व मानसिक तणावात आम्ही अभ्यास करत आहोत. महाराष्ट्रात लोकसेवा आयोगाने सतत परीक्षा पुढे ढकलल्यामुळे तो ताण आणखीनच वाढला आहे.

आतापर्यंत आम्ही अनेक अर्ज विनंत्या केल्या. मात्र पाच महिन्यापासून विद्यावेतन काही मिळाले नाही. तुम्ही आम्हाला नियम व अटी सांगून आमचे विद्यावेतन देण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे. तुमचे म्हणणे जर नियमाला धरुन असेल तर मग सरकारी नोकर वर्गाला सुद्धा तो नियम का लागु नाही ?

पुरोगामी महाराष्ट्रात जर विद्यार्थ्यांची अशी कुचंबणा होत असेल तर आम्ही यातून काय बोध घ्यावा. इकडे मराठवाड्यात शेतीची अवस्था, सततचा दुष्काळ व अनेक विद्यार्थी भुमिहीन असल्यामुळे आमच्या घरच्या लोकांचे मानसिक खच्चीकरण तर वर्षानुवर्षे होतच आले आहे. मात्र आता नवी उम्मीद घेऊन आम्ही शिक्षण घेत आहोत तर आम्हाला अशा संकटाचा सामना करावा लागत आहे. यातून आमचे मानसिक खच्चीकरण होत आहे. तसेच आमच्यात प्रचंड नैराश्य निर्माण झाले आहे. आता एक कळत नाही आम्ही अभ्यास करावा की अर्ज विनंत्या पाठवून वेळ घालवावा.

दरम्यान, कालपासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. मात्र, अद्याप बार्टीकडून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here