चौफेर न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) येत्या रविवारी (दि.14) राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार होती. मात्र करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ही परीक्षा नियोजित वेळापत्रकनुसार न होता पुढे ढकलण्यात येत आहे, असे आयोगाने गुरूवारी स्पष्ट केले.
आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा येत्या रविवारी होणार असल्याने उमेदवारांनी परीक्षेची तयारी केली होती. या परीक्षेचे हॉलतिकीटही उमेदवारांनी डाऊनलोड केले होते. तसेच अभ्यासाचे नियोजन अंतिम टप्प्प्यात असताना करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा ही परीक्षा पुढे ढकलावी लागली. त्यामुळे स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा हिरमोड झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
राज्यांमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने ही परीक्षा पुढे ढकलावी, असे राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मुदत व पुनर्वसन विभागाकडून दि. 10 मार्च रोजी आयोगास पत्राद्वारे कळविले आहे. त्यानुसार ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. या परीक्षेचा सुधारित तारीख यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.