चौफेर न्यूज – वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेची (नीट) तारीख आणि अर्ज प्रक्रियेबद्दल लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. परंतु कोरोना परिस्थितीचा विचार करून ‘नीट’ परीक्षा ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी देशभरातील विद्यार्थ्यांनी केली आहे.
‘नीट’ परीक्षा कधी घ्यायची याचा निर्णय केंद्र सरकार आणि राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) घेणार आहे. त्यासंदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांची बैठक नुकतीच झाली. देशातील सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांना यासंदर्भात त्यांचा अहवाल पाठवण्याच्या सूचना बैठकीनंतर देण्यात आल्या. जेईई मेनची उर्वरित सत्रे आणि ‘नीट’ परीक्षा घेण्यात याव्यात यावर बैठकीत एकमत झाले असले तरी परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.
दरम्यान, देशभरातील विद्यार्थ्यांनी ‘नीट’ परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली आहे. बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थीही ‘नीट’ परीक्षेला बसण्याची शक्यता आहे. बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर झालेली नसल्याने ‘नीट’ परीक्षेच्या तयारीसाठी आणखी काही वेळ मिळावा अशी विद्यार्थ्यांची विनंती आहे. ‘नीट’ बाबत म्हणजेच अगदी पदवीपूर्व ‘नीट’ परीक्षेबाबतही कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सरकारने सर्व आवश्यक बाबींचा विचार करावा, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.