चौफेर न्यूज – स्मार्टफोन नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना विचारात घेऊन टीव्हीच्या माध्यमातून घराघरात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्याचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घेतला आहे. उद्या 14 जूनपासून राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘डीडी सह्याद्री’ वाहिनीवरून सोमवार ते शुक्रवारदरम्यान दररोज 5 तासांचे (300 मिनिटे) इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे.
कोरोनामुळे राज्यातील शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू असून विद्यार्थी स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑनलाइन वर्गात सहभागी होत आहेत. मात्र शाळांनी दिलेल्या अहवालानुसार 50 टक्क्यांहून अधिक मुलांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे ऑनलाइन वर्गात गैरहजर राहणाऱया विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ‘डीडी सह्याद्री’च्या माध्यमातून वर्ग भरविण्यात येणार आहेत. पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘ज्ञानगंगा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिकविण्यात येणार असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून माहिती देण्यात आली आहे.
सदरचे प्रक्षेपण सोमवार ते शुक्रवार सकाळी 7ः30 ते दुपारी 3ः30 या वेळेमध्ये ‘डीडी सह्याद्री’ वाहिनीच्या काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता केले जाणार आहे.z
प्रथम टप्प्यामध्ये दहावी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम तसेच बारावीच्या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरू करण्यात येत आहे. उर्वरित इयत्तांच्या तासिकांचे प्रक्षेपणदेखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे.z
सदरच्या शैक्षणिक कार्यक्रमाच्या दैनिक प्रसारणाचे सविस्तर वेळापत्रक हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर प्रदर्शित केले जाणार आहे.z
‘सह्याद्री’ वाहिनीवर प्रक्षेपित होत असलेल्या DD Free Dish – 525, Dish
TV – 1229, Videocon D2H- 769, Tata Sky – 1274, Hathway – 513 या चॅनेल क्रमांकावर कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहता येईल.z