चौफेर न्यूज – गतवर्षी मार्च महिन्यापासून देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्याने विद्यार्थ्यांसाठी शाळा बंदच होत्या. यंदाही पहिली ते बारावीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या. मूल्यमापनानुसार गुणदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. बारावी निकालाचा तिढा सोडविताना, राज्य शिक्षण मंडळाने मूल्यमापनासाठी ३०:३०:४० चे सूत्र जाहीर केले आहे. बारावीचा निकाल तयार करण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर मुख्याध्यापक आणि प्राचार्यांसह कमाल सात सदस्य असलेली निकाल समिती स्थापन केली जाणार आहे. दरम्यान, मूल्यमापनासाठी ३०:३०:४० चे सूत्र जाहीर झाल्याने आणि बारावीचे प्रॅक्टिकल झाले नसल्याने, तसेच गतवर्षी अकरावीची परीक्षादेखील झाली नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती वर्तविली जात आहे.
बारावीसाठी असे होणार गुणदान
मूल्यमापनासाठी ३०:३०:४० चे सूत्र जाहीर झाले. यात दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांच्या सरासरी गुणांचे ३० टक्के, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुणांचे ३० टक्के आणि बारावीच्या वर्षभरातील सत्र परीक्षा, सर्व चाचण्या आणि तत्सम परीक्षांच्या विषयनिहाय गुणांच्या ४० टक्क्यांच्या गुणांच्या अंतर्भाव राहणार आहे.
बारावीतील विद्यार्थी २४८०९
गेल्यावर्षी अकरावीच्या परीक्षाच झाल्या नाहीत…
गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.
अकरावीच्या परीक्षाच झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले याचा लेखाजोखा नाही. त्यामुळे बारावीचे गुणदान करताना अकरावीतील गुण नेमके कोणत्या आधारावर ग्राह्य धरण्यात येतील, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडला आहे.
बारावीला अंतर्गत गुण कोठे असतात?
यंदा बारावीचे प्रॅक्टिकल झाले नाही, बारावीला अंतर्गत गुणही नाहीत. त्यामुळे अंतर्गत गुणानुसार गुणदान कसे होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सत्र परीक्षा, चाचण्यादेखील ऑनलाईन पद्धतीने झालेल्या आहेत. त्यामुळे अंतर्गत गुण देताना प्राध्यापकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.